भाजप आमदार नितेश राणे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आणि नितेश राणेंना 10 दिवसांत न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आज नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांची मुदत दिली असतानाही 24 तासांतच राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले आहेत.
नितेश राणे यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा न्यायालयात उपस्थित होते. यासोबतच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने न्यायालयाच्या बाहेर उपस्थित होते. कार्यकर्त्यांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. सरकारी वकील प्रदीप घरत अनुपस्थित राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता या प्रकरणात पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होणार की नाही? या बाबत सोमवारी स्पष्टीकरण मिळेल.