TOD Marathi

टिओडी मराठी, काबूल, दि. 16 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तानवर पूर्ण कब्जा केल्यानंतर तालिबान दहशतवाद्यांनी रविवारी मध्यरात्री सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. तालिबान दहशतवाद्यांच्या या घोषणेनंतर जगातील सर्वच देश सतर्क झालेत. अफगाणिस्थानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना आणि दूतावासांतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे नियोजन सुरू केलं आहे. ब्रिटनबद्दल बोलायचं झालं तर तेथील खासदारांना सुट्ट्यांवरून परत बोलावलं आहे. कारण अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीवर संसदेत चर्चा होईल.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलकडे मोर्चा वळविल्याने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी आपल्या मंत्रिमंडळाच्या आपत्कालीन समितीची बैठक बोलावली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर इतर नाटो फौजांप्रमाणे ब्रिटननेही आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे.

काबूलमधील 11 जिल्ह्यांवर वर्चस्व प्रस्थिपित केल्यानंतर तालिबानने सर्व व्यवसायिक उड्डाणांवर बंदी आणलीय. त्यासह विमानतळावर उपस्थित असलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराची विमाने मदतीसाठी पोहोचली आहेत. अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने ही माहिती दिलीय.

शांततेत सत्ताबदल करण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. तालिबानी व अफगाण सरकार प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. विविध देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षिततस्थळी हलवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सुमारे 129 भारतीय नागरिकांना दिल्लीत सुरक्षित आणण्याची मोहीम राबवली जात आहे.

भारताने काबूलमधील दुतावास अजून बंद केलेलं नाही. भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नियोजन करत आहेत, अशी माहिती भारतीय दुतावासातील सूत्रांनी दिलीय.