TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 16 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली आहे.

आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हि याचिका फेटाळल्याने अनिल देशमुख यांना मोठा दणका बसला आहे.

अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मनी लाँड्रिंग कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत दाखल गुन्ह्या प्रकरणी कोणत्याही दंडात्मक कारवाईतून संरक्षण मिळावे, यासाठी याचिका दाखल केली होती. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुलाला सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी अनेकदा समन्स पाठवले आहेत.

महाराष्ट्र पोलिसांच्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ईडीपुढे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जाण्यास टाळाटाळ करत आहेत, असे आढळत आहे. तरीही ईडीने त्याचा पाठलाग सुरूच ठेवला आहे.