टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 7 ऑगस्ट 2021 – सध्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरुन लॉबिंग सुरु झालं आहे. भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची गच्छंती होणार आहे, असे चिन्ह दिसत आहे. चंद्रकांत पाटील यांची गच्छंती करून त्या जागेवर आशिष शेलार यांची नियुक्ती करावी, यासाठी भाजपचा एक गट लॉबिंग करत आहे. त्यामुळे आता या लॉबिंगचा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे.
चंद्रकांत पाटील सध्या दिल्लीमध्ये आहेत. कालपासून त्यांचा चार दिवसांचा दिल्ली दौरा सुरु झालाय. याच दरम्यान आपली गच्छंती होऊ नये, यासाठी चंद्रकांत पाटील हि लॉबिंग करत आहे.
भाजपचे नेते अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचे संबंध बघता आपल्या संबंधाचा फायदा घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील करत आहे. मात्र, आगामी काही दिवसात प्रदेशाध्यक्ष पदाचा वाद निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न भाजप हायकमांड करत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांच्या शर्यतीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांचे नाव आहे. तर दुसरीकडे आशिष शेलार हे मुंबईचे आहेत. महाराष्ट्राचा अध्यक्ष हा साधारणतः ग्रामीण भागातील असतो.
भाजपमध्ये अध्यक्ष बदलण्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया अदयाप सुरू झालेली नाही, असे पक्षातील काही सूत्र सांगत आहेत. या दरम्यान सुधीर मुनगंटीवार हे याअगोदर दोनदा प्रदेशाध्यक्ष राहिले असून त्यांच्या नावाची चर्चा आहे.