टिओडी मराठी, सांगली, दि. 2 ऑगस्ट 2021 – संकटं आली की आपल्याकडे पॅकेज जाहीर करतात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. संकट आलं की पॅकेजची घोषणा होते. मग, हे पॅकेज जातं तरी कुठं?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. मला अशी थोतांड येत नाहीत. मला खोटं बोलता येत नाही. जे करायचं ते प्रामाणिकपणे कारेन, आणि ते केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांची एक छोटी सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय.
मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये खूप नुकसान झालं आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आहे.
आज मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. पावासाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या भिलवडी गावात आज मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं आहे.
कोरोना संकट आणि पुराचं संकट या दोन्ही संकटाचा सामना आपण करतोय. त्यामुळे गर्दी करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केलं होतं. पावसामुळे झालेल्या नुकसानीची मला कल्पना आहे.
तुमच्या वेदना आणि व्यथा आमच्यापर्यंत पोहोचल्यात. त्यामुळे काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. आमच्याकडून जे काही करता येईल ते ते आम्ही करू, असे आश्वासन त्यांनी सांगलीकरांना दिलं.
सांगलीमध्ये अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर प्रशासानाने 4 लाख कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. मुख्यमंत्र्यांसोबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित होते.