TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 2 ऑगस्ट 2021 – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर सडेतोड टीका केली जातेय. कालच्या एका कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सडेतोड समाचार घेतला. आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भाजपला इशारा वजा आव्हान दिलं आहे. 

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, कुणाला एवढी खूमखूमी आली असेल, कुणाला झटका आला असेल तर हिंमत असेल तर समोर या. स्वत:च्या पायावर याल पण, जाताना खांद्यावरून जाल. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्या प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली. तसेच भाजप आमदारांना दम दिला आहे.

महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते कार्यकर्ते असो ज्यांना महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेविषयी जाणीव आहे ते असे कोणतं वक्तव्य करणार नाही. मूळ भाजपचे लोक असे वक्तव्य कधी करणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

सत्ता गेल्याने बाटग्यांना झटके येताहेत. सत्ता भोगायला मिळेल म्हणून त्या पक्षात गेले. पण, सत्ता न आल्याने भ्रमनिरास झाला. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोकं उद्योग करताहेत. भाजप सारख्या एका जुन्या पक्षाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.