टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 2 ऑगस्ट 2021 – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जोरदार गोंधळ सुरू आहे. पेगॅसस हेरगिरी प्रकरण विरोधकांनी लावून धरलंय. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पेगॅससवरून विरोधी पक्षातील खासदारांची जोरदार घोषणाबाजी सुरूय. त्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित केलं जातंय. अधिवेशनाचे अनेक बहुमूल्य तास यामुळे वाया गेलेत. पेगॅसस आणि कृषी कायद्यांविरोधात आक्रमक झालेले विरोधी पक्ष आता वेगळाच मार्गाचा अवलंब करणार आहेत, असे समाजत आहे. त्यासाठी दिल्लीत जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्यात.यामुळे आता मोदी सरकारचे टेन्शन वाढलं आहे.
संसदेत वारंवार होत असलेल्या गोंधळामुळे कामकाज होत नाही. त्यामुळे आता विरोधकांनी संसदेबाहेर समांतर संसद चालवण्याची तयारी सुरू केली आहे. विरोधक संसदेच्याबाहेर समांतर संसद चालवण्याच्या तयारीत आहेत. याबद्दलचा प्रस्ताव तयार केला असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबतच्या बैठकीत याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे.
राहुल यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना उद्या सकाळी साडे नऊ वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये नाश्त्यासाठी बोलावलंय. या बैठकीला दोन्ही सदनातील विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असून विरोधकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने राहुल यांचा हा पहिला प्रयत्न आहे.
राहुल गांधींनी उद्याच्या बैठकीसाठी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना उद्याच्या बैठकीचे निमंत्रण दिलंय. तृणमूल काँग्रेसलाहि निमंत्रण पाठविलं आहे. मात्र, आपल्याला अद्याप तरी निमंत्रण मिळालं नाही, असे तृणमूलमधील सूत्रांनी सांगितलं आहे.
राहुल गांधी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताहेत. याअगोदर दोनवेळा ते विरोधी पक्षाच्या बैठकीत सहभागी झालेत. विजय चौक परिसरामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा सहभाग होता. आता त्यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये सर्वांना नाश्त्याचे आमंत्रण दिलंय.