TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 2 ऑगस्ट 2021 – शिवाजीनगर इथे रविवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये वाहतूक शाखा आणि मोटार वाहन न्यायालयाने १० हजार खटले निकाली काढले. त्या सुमारे सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे. वाहतूक शाखेकडून वेगवेगळ्या कारणावरुन वाहनचालकांवर कारवाई केली जाते. मात्र, अनेक वाहनचालक या दंडात्मक कारवाईला जुमानत नाही. तेव्हा वाहतूक शाखेकडून त्यांच्यावर खटले दाखल केले होते.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोटार वाहन कोर्ट व वाहतूक शाखेच्या वतीने १० हजार खटले या लोक अदालतीत ठेवले होते. कारवाई झालेल्या वाहनचालकांना त्याची नोटीस बजावली होती. न्यायालयाची नोटीस पाहिल्यावर मात्र वाहनचालकांनी ताबडतोब दंडाची रक्कम भरायला सुरुवात केली आणि आपला खटला निकाली काढून घेतला.

या लोक अदालतीत एकूण ९ हजार ९९१ केसेस निकाली काढल्या. त्यात १ कोटी २२ लाख ५८ हजार ७५० रुपये दंडाची रक्कम जमा केली आहे. मोटार वाहन न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एस पारखे आणि वरिष्ठ लिपिक आर डी भुरकुंडे यांनी कामकाज पाहिले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आय यु पटेल, डी. सी. आंब्रे, महिला हवालदार व्ही. ए. चिंचाेळकर, पोलीस अंमलदार के.आर. शिंदे, व्ही.के. खोत, महिला पोलीस अंमलदार आर. एच. इनामदार, पी.व्ही.साळवे, एम.आर.राठोड, एस.एस.धोत्रे, एस.एस. विभुते, एस. ए. भोसले, वाय. एम. मोहिते यांनी काम पाहिले आहे.