टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 जुलै 2021 – सध्या इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून इतर अॅप व्हॉट्सअॅप खूप लोकप्रिय आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवणं अवघड आहे. त्यामुळे भारत सरकारने व्हॉट्सअॅपला पर्याय शोधून काढला आहे. केंद्र सरकारकडून आज संदेस या हे भारतीय मेसेजिंग अॅप लॉन्च केलंय. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘संदेस अॅप’ संदर्भात लेखी स्वरुपात माहिती संसदेमध्ये सादर केली आहे.
आता भारतीय व्हॉट्सअॅपऐवजी ‘संदेस’ अॅप’ वापरू शकतात. आता व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपला ‘संदेस’ अॅप’ टक्कर देईल, यात वाद नाही. भारतात विकसीत केलेलं हे संदेस अॅप फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअॅपला उत्तम पर्याय ठरणार आहे.
व्हॉट्सअॅपच्या कार्यपद्धतीप्रमाणे संदेस अॅप काम करणार आहे. त्यामुळे युजर्सला अॅप वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही. संदेस अॅप हे सध्या सरकारी कर्मचारी व सरकारशी निगडीत इतर कंपन्यांचे कर्मचारी प्रायोगिक तत्वावर वापर करत आहेत, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
संदेस अॅप हे ओपन सोर्स व्यासपीठ असून ते सुरक्षित आहे. यासोबत याचं संपूर्ण नियंत्रण केंद्र सरकारकडे असणार आहे.
वन-टू-वन, ग्रूप मेसेजिंग, फाइल आणि मीडिया शेअरिंग, ऑडिओ-व्हिडिओ कॉल आणि e-gov अॅप्लिकेशन आदी सुविधा संदेस अॅपमध्ये उपलब्ध असणार आहेत.
हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे, असे चंद्रशेखर यांनी सांगितलं आहे.
संदेस अॅप हे भारतीय मोबाइल अॅप्लिकेशनला प्रोत्साहन देण्यासाठी टाकलेलं एक पाऊल आहे. मागील काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल मीडिया अॅप्लिकेशन्स आणि केंद्र सरकारमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीवरुन वाद सुरूय.