टिओडी मराठी, मुंबई, दि. 23 जुलै 2021 – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. आपण हि आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, अशा शोकसंवेदनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्यात.
रायगड जिल्ह्यामध्ये तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) इथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण 10 ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झालेत.
या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे केला जाईल.
मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत भीषण परिस्थिती निर्माण झालीय. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांसोबत कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत देखील पावसाने थैमान घातले आहे.
कोकणातील अनेक भागांत दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झालाय. आता मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर केली आहे.