टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 जुलै 2021 – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून खासगीकरण करण्यात येणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांच्या यादीमध्ये एअर इंडिया वरच्या स्थानावर आहे. तसेच हि विमान कंपनी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. त्यामुळे हे मोदी सरकार एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका देणार आहे, असे समजते. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येणाऱ्या सुविधा काढून घेणार आहेत.
कोरोनामुळे एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया थांबली आहे. मात्र, अशात आता केंद्र सरकारकडून एअर इंडियातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या काही सुविधा काढून घेण्याचा विचार सुरू आहे. खासगीकरणानंतर एअर इंडियाचा ताबा दुसऱ्या कंपनीकडे जाणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडूनही कर्मचाऱ्यांसाठी नव्या अटी-शर्ती लागू केल्या जातील, असेही सांगितले जात आहे.
याविरोधात एअर इंडिया कर्मचारी संघटनेने नागरी उड्डाण मंत्रालयाकडे दाद मागितली होती. खासगीकरणानंतरही एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना देणाऱ्या आरोग्य सुविधा, भविष्य निर्वाह निधी, सुट्ट्यांचे पैसे मिळणे या सुविधा सुरु राहिल्या पाहिजेत, अशी मागणी केली आहे.
या सुविधा कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे. कंपनी दिवाळखोरीमध्ये निघाल्यानंतरही एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सध्या आरोग्य सुविधा, भविष्य निधी योजना व मोफत विमानप्रवास अशा सुविधा मिळत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही वर्षातून ठराविकवेळा मोफत विमानप्रवास करता येत आहे.
या दरम्यान, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाने नुकताच काही मालमत्तांचा लिलाव केला होता. यात एक रहिवासी प्लॉट आणि एका फ्लॅटची विक्री केली होणार आहे.
याशिवाय औरंगाबाद येथील एक बुकिंग कार्यालय, स्टाफ क्वार्टर, नाशिकमध्ये सहा फ्लॅट, नागपूरमध्ये एक बुकिंग ऑफिस, भुजमध्ये एअरलाईन हाऊस आणि प्लॉट, तिरुवनंतपुरमध्ये एक प्लॉट आणि मंगळुरूमधील दोन फ्लॅटस यांचा समावेश होता.