TOD Marathi

बकरी ईदसाठी Corona निर्बंध शिथील केल्याप्रकरणी SC चा Keral सरकारला झटका ; SC म्हणाले, कोणताही दबाव लोकांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणार नाही

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 जुलै 2021 – सर्वोच्च न्यायालयाने बकरी ईदच्या निमित्ताने निर्बंध शिथील करणाऱ्या केरळ सरकारला झटका दिलाय. केरळ सरकारला कावड यात्रेसंबंधी दिलेल्या आदेशाचे उदाहरण ठेवत बकरी ईदलाही या नियमांचे पालन करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. ही सुनावणी न्यायमूर्ती रोहिंटन फली नरीमन आणि बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर झाली. आम्ही कावड यात्रा प्रकरणामध्ये दिलेल्या आदेशाचे पालन केले जावे, असा आदेश आम्ही केरळ सरकारला देत आहे, असे यावेळी खंडपीठाने म्हंटले आहे.

यावेळी केरळ सरकारने न्यायालयामध्ये निर्बंध शिथील करण्यासाठी लोकांकडून दबाव येत आहे, असा युक्तिवाद केला. यावेळी न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही प्रकारचा दबाव लोकांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. कोणतीही अनुचित घटना घडली, तर जनता आमच्या लक्षात आणू शकते व त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

बकरी ईदच्या निमित्ताने केरळ सरकारने राज्यातील निर्बंध शिथील केल्याविरोधात दिल्लीतील एका नागरिकाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रेचे आयोजन केल्यानंतर स्वत:हून दखल घेतलेल्या सर्वोच्च न्यायालयाला यात मध्यस्थी करण्याची विनंती केली होती.

तसेच इतर राज्यांत परिस्थिती सुधारत असताना केरळमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, असे याचिकाकर्त्याने सांगितले होते. केरळ सरकारने १८ जुलै, १९ जुलै आणि २० जुलै असे तीन दिवस बकरी ईदच्या निमित्ताने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केले होते.

सणासुदीला आमची दुकाने सुरु राहिल्यास लॉकडाऊनच्या काळामध्ये बसलेल्या आर्थिक फटक्यातून थोडे सावरु शकतो, असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे, असे केरळ सरकारने न्यायालयाला सांगितले होते.