TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 मे 2021 – नुकतीच एअर इंडियाने काही रिक्त पदांसाठी भरती काढली अन आता एअर इंडियाच्या पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीमवर हॅकर्सचा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुमारे जगातील 45 लाख प्रवाशांच्या डेटा सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत एअर इंडियाने दिलेली माहिती अशी, काही लोकांची माहिती कंपनीची डेटा प्रोसेसर कंपनी सीता पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीमकडून लीक झाली आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम जगभरातील 45 लाख प्रवाशांच्या डेटा सुरक्षिततेवर झाला आहे.

या दरम्यान, सायबर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एअर इंडियाकडून प्रवाशांनी आपल्या क्रेडिट कार्डचे पासवर्ड बदलावे, असे आवाहन केले आहे. कारण, लीक झालेल्या माहितीत क्रेडिट कार्डची माहिती, नाव, जन्मतारीख असा तपशीलाची चोरी झाल्याचे समजत आहे.

26 ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 दरम्यान नोंदणी असणाऱ्या एअर इंडियाच्या पॅसेंजर सर्व्हिस सिस्टीमवर जगातील 45 लाख प्रवाशांच्या डेटावर डल्ला मारला आहे. याबाबतची पहिली सूचना 25 फेब्रुवारी 2021 ला पहिल्यांदा समोर आली होती.

प्रवाशांची खासगी माहिती ज्यात त्यांचे नाव, जन्म तारीख, मोबाईल क्रमांक, पत्ता, पासपोर्ट क्रमांक, तिकीटाची माहिती, स्टार अलायंस आणि एअर इंडियाच्या फ्रिक्वेंट फ्लायर्सचा डेटा आणि क्रेडिट कार्डसंदर्भातील माहिती चोरीला गेलीय.

या प्रकरणाची माहिती समोर येताच सारवासारव करत एअर इंडियाने प्रवाशांच्या क्रेडिट कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक लीक झाला नाही, असे म्हटले आहे. तर, सातत्याने प्रवास करणाऱ्यांचा पासवर्ड डेटाही सुरक्षित आहे, असा दावा कंपनीने केला आहे.