टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 1 जुलै 2021 – पेट्रोल-डिझेलच्या किंमतींसह साबन, शॅम्पू आणि टूथपेस्ट सारख्या दैनंदीन वापरातील आणि गरजेच्या वस्तुंच्या किंमतीही अधिक प्रमाणात वाढ झालेली आढळत आहे. मागील तीन महिन्यांत दैनंदीन वापरातील अनेक वस्तुंच्या किंमती सुमारे 3 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढल्यात. यात साबन, शॅम्पू, टूथपेस्टशिवाय वॉशिंग पावडर, चहा पावडर, खाद्य तेल, केचप, जॅम, नूडल्स आणि बेबी फूड आदी वस्तूंचा समावेश होत आहे.
इतकंच नाही, तर 1 जुलै 2021पासून अमूलनेही दिल्ली-एनसीआरसह अहमदाबाद आणि गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये दुधाच्या किंमती 2 रुपये प्रति लिटरने वाढवल्यात.
दोन रुपये प्रती लीटर भाव वाढ केल्याने एमआरपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होते. यामागील 1.5 वर्षांमध्ये अमूलने दुधाच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ केली नव्हती.
सरकारी तेल कंपन्यांनी घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये 25 रुपयांनी वाढ केलीय. दिल्लीमध्ये एलपीजी सिलिंडरचा भाव आता 834 रुपये झाला आहे. याअगोदर घरगुती गॅसची किंमत 809 रुपये एवढी होती.
एप्रिल महिन्यामध्ये सिलिंडर 10 रुपयांनी स्वस्त झाले होते. यानंतर मे-जूनमध्ये किंमतीत काहीही बदल झाला नाही. आज दिल्लीशिवाय कोलकात्यात एलपीजी सिलिंडर 861 रुपयांना विकले जात आहे. तर, मुंबई व चेन्नईमध्ये सिलिंडरची किंमत अनुक्रमे 834 आणि 850 रुपये इतकी आहे.