TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 1 जुलै 2021 – गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार आहे, असे सांगितले जात होते. यासाठी काही नेत्यांनी मुदतही दिली होती. मात्र, अद्याप महाविकास आघाडी सरकार उत्तम आणि भक्कम आहे. त्यातच आता भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार कसं पडेल? याबाबत भाकीत केलं आहे. त्यांनी असं म्हंटलं कि, महाविकास आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील पुढे म्हणाले कि, आघाडी सरकार अधिक दिवस चालणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे, केवळ वेळेचा प्रश्न आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदावरून सरकारवर टीका केली आहे. राज्यातील आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला भीत आहे. त्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास राहिलेला नाही, असे सांगतानाच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याबाबत भाजप निर्णय घेणार आहे, असे देखील राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दावरून महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. मराठा व ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर सरकारने प्रायश्चित्त घ्यायला हवे होते. त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती.

मात्र, ते तसं न करता सर्व काही केंद्र सरकारवर ढकलंत आहेत. काहीही झालं की केंद्र सरकारवर ढकलायचं ही आता फॅशन झाली आहे, असेही झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.