टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 जून 2021 – पुढील वर्षी उत्तर प्रदेश राज्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपने रिपब्लिकन पक्षाशी युती करावी. उत्तर प्रदेशामध्ये रिपाईचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे मायावतींच्या बहुजन समाज पक्षाकडे (बसपा) गेलेला दलित मतदारवर्ग भाजपकडे वळवता येणार आहे, असे वक्तव्य रिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
रामदास आठवले यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांत आगामी काळात विधानसभा निवडणुकां होणार आहेत.
याबाबत या नेत्यांत चर्चा झाली. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता आणि रिपाइंचे उत्तर प्रदेश प्रभारी जवाहर हे उपस्थित होते.
उत्तर प्रदेशामध्ये मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला शह द्यायचा असेल तर भाजपने रिपब्लिकन पक्षाला सोबत घ्यावे. उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचे संघटन उत्तम आहे.
उत्तर प्रदेशात मूळ रिपब्लिकन पक्षाचा मतदार बहुजन समाज पक्षाने आपल्याकडे वळविला आहे. मात्र, आता बहुजन समाज पक्षाकडे गेलेला रिपब्लिकन पक्षाचा मतदारवर्ग पुन्हा आपल्याकडे वळवता येणार आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.