TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 जून 2021 – ऑनलाईन पैसे भरून देखील अभिनेत्री शबाना आझमी यांना दारू मिळालेली नाही. कालांतराने मद्य विक्रेत्याकडून फसवणूक झाल्याचे कळले. करोना काळात घराबाहेर जाण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून हव्या असलेल्या वस्तू ऑर्डर केल्या जात आहेत. मात्र ऑनलाईन खरेदी करत असताना योग्य काळजी न घेतल्यास आपली फसवणूक देखील होऊ शकते. याचाच प्रत्यय ज्येष्ठ अभिनेत्या शबाना आझमी यांना आला आहे.

याबाबतची माहिती स्वतः शबाना आझमी यांनी ट्विट करून दिली आहे. याबाबत आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ‘लिव्हिंग लिक्विड’ या ऑनलाईन मद्य विक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून ऑनलाईन मद्य मागवले होते. याचे बिल त्यांनी ऑनलाईन भरले होते. मात्र, यानंतर ही ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.

‘याबाबत आपण ‘लिव्हिंग लिक्विड’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी आपले फोन उचलणे बंद केलं, अशी कैफियत आझमी यांनी मांडलीय. ट्विटद्वारे आझमी यांनी पैसे पाठवले? याबाबतची माहिती दिली आहे. तसेच इतरांना ऑर्डर करताना सावधानता बाळगावी, असा सल्ला दिला आहे.

या दरम्यान, शबाना आझमी यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना ऑनलाईन मद्य मागवल्यानंतर आपल्या सोबतही अशाच प्रकारची फसवणूक झाली आहे, असे म्हटलंय. तर काहींनी याबाबत पोलिसांत तक्रार करा, असा सल्ला आझमी यांना दिला आहे.