टिओडी मराठी, कोलकाता, दि. 2 जून 2021 – केंद्र सरकारच्या एकाधिकारशाहीच्या कारभाराच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलंय. ‘जो डर गया, समझो मर गया’ असे म्हणत त्यांनी केंद्राच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिलेत. केंद्र सरकारला राज्यांवर आपली मनमानी करताच येणार नाही. या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये सीमारेषा आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ते मान्य केले होते. सरकारीया कमिशनच्या अहवालातही ही बाब स्पष्टपणे नमूद केली आहे. नंतर हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केलाय. त्यामुळे राज्य सरकारांना आपल्या अधिकाराची जपणूक करण्यासाठी एकजुटीने पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी म्हंटलं आहे.
नरेंद्र मोदींच्या राजवटीत फेडरलिझमची धज्जीया उडवली जातेय. चर्चेची किंवा सल्लामसलतीची प्रक्रिया थांबली आहे. काल पंतप्रधान मोदींच्या सरकारने बंडोपाध्याय यांना खुलासा करण्याची नोटीस बजावून जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार केलाय. मोदींना असले सल्ले देतो कोण? असा सवालही त्यांनी केलाय. ममतांकडून तुम्ही पराभूत झाला आहात म्हणून त्याचा बदला या पद्धतीने तुम्ही घेत आहात काय? असा सवालही ममतांनी उपस्थित केलाय.