टिओडी मराठी, पुणे, दि. 18 मे 2021 – पुणे शहरात सद्यस्थितीत लसीकरण मोहिम संथ गतीने सुरु आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रावर नागरिक गर्दी करत आहेत. त्यासाठी सोसायट्यांत जाऊन लसीकरण सुरू करावे, अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने केलीय.
पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात एकूण 20 हजार गृहनिर्माण सोसायटी आहेत. त्यापैकी 12 हजार पुणे शहरामध्ये आहेत. येथील नागरिकांसाठी लसीकरण करण्याची मागणी केली आहे.
जहांगीर रुग्णालयाने सोसायटीमध्ये जाऊन लसीकरण सशुल्क सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे, असे महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी सांगितले आहे. आज याबाबत महापालिका व जहांगीर रुग्णालयात बैठक होणार असून महापालिकेच्या परवानगीनंतर अंमलबजावणी होणार आहे.
जहांगीर रुग्णालयाकडून लसीकरणासाठी वाहने व मनुष्यबळ देण्यात येणार आहे. पहिला व दुसऱ्या डोसबद्दल माहिती मिळवून लसीकरणाची योजना आखली जाईल. ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी होण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचललं आहे. मुंबईच्या महापालिकेने सोसायटीत लसीकरण सेवा सुरू केलीय. त्याचप्रमाणे पुण्यात सुरू केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असे देखील पटवर्धन यांनी स्पष्ट केले.
गृहनिर्माण सोसायट्यांचे व्हाट्स अँप ग्रुप असून त्याद्वारे याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची महासंघाची तयारी आहे. त्यासाठी पुणे महापालिकेची परवानगी अत्यावश्यक आहे. लसींचा पुरवठा करणे हे देखील आव्हान असणार आहे. आजच्या बैठकीत निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.