TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 18 मे 2021 – देशात कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवतोय. लसच्या तुटवड्यावरून विरोधक सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताहेत. ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी देखील पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका करून म्हणाले, देशात कोणाच्याही जीवाची किंमत राहिली नाही.

देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या काही अंशी घटताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवतेय.

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबुकवर देशातील कोरोना लसीकरणाबाबत एक पोस्ट लिहून मोदी सरकारवर टीका केलीय. रवीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलय की, राज्यसभेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितले की, दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतातून कोरोना लसींचे डोस पाठवले आहेत.

दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतातून कोरोना लसींचे डोस परदेशात पाठवले. जेणेकरून तेथून येणारे नागरिक भारतात आल्यावर कोरोनाचा फैलाव होऊ नये. याचाच अर्थ, केंद्रातील मोदी सरकारला दुसऱ्या देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिक चिंता होती. त्यासाठीच एक कोटी कोरोना लसी पाठवल्या. यावर हसावं की रडावं? हेच समजत नाही.  आता सत्य बाहेर पडतय. तेव्हा सर्व लसी निर्यात केलेल्या नाहीत, अशी सारवासरव केंद्र सरकार करत आहे, असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे.

सांगा, सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?
याअगोदर रवीश कुमार यांनी पंतप्रधान मोदीसह केंद्र रकारवर टीका केली होती. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या ताज्या अहवालानुसार, केवळ एप्रिल महिन्यात ३४ लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरी गेलेल्यांच्या घरी आजारी व्यक्ती असेल, तर त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल?, अशात उपचारांचा खर्च करण्याबाबत त्यांचा आत्मविश्वास ढासळला असेल. कारण, अशा परिस्थितीत कोणीही मदत करत नाही. बँकेकडूनही सूट मिळत नाही. नागरिकांना आता काहीच नको, असे सरकारने मान्य केले आहे का? कोणतेही सरकार इतके निर्दयी कसे असू शकते का? हे अतिशय खेदजनक आहे, अशी खंत रवीश कुमार यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलीय.

या दरम्यान, देशात मागील २४ तासात २,६३,५३३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या भारतात ३३,५३,७६५ रुग्णांवर उपचार सुरू असून सुमारे १८ कोटी ४४ लाख ५३ हजार १४९ जणांना कोरोनाची लस दिली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिली आहे.