टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 मे 2021 – देशात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नरेंद्र मोदी सरकार 17 कोटी जनतेला लस दिल्याचे सांगत आहे. पण, लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणामध्ये देशात सुसूत्रता दिसत नाही. म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.
देशातील कोरोना नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार फेल ठरलं आहे. त्यामुळे केंद्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहीमही फसली आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. लोकशाही शासन व्यवस्थेत न्यायव्यवस्था ही आत्मा समजली जाते. परंतु, मोदी सरकारने हा आत्मा संपवण्याचे काम सुरू केलंय.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात असल्याची चुकीची माहिती सुप्रीम कोर्टात सादर करून कोर्टाने कोरोनामध्ये हस्तक्षेप करू नये, न्यायालयाने या विषयातील तज्ज्ञ नाहीस, असे म्हणत न्यायालयाचा अवमान केला आहे, असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोले म्हणाले, नोटाबंदी करताना नरेंद्र मोदींनी कोणाचा सल्ला घेतला?
नोटाबंदी जाहीर करताना नरेंद्र मोदी यांनी कोणत्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेतला होता का? आणि मुळात नरेंद्र मोदी अर्थतज्ञ आहेत का? तसे नसतानाही नोटाबंदी जाहीर करून लोकांना वेठीस का धरले?.
सुप्रीम कोर्टात याअगोदर कोलगेट, टू जी प्रकरण आले होते. त्यावेळच्या यूपीए सरकारने कोर्टाला अशा प्रकारे हस्तक्षेप करू नका, असे म्हटले नव्हते. सुप्रीम कोर्टाने देशातील कोरोनाची विदारक परिस्थिती पाहूनच टास्क फोर्स स्थापन केलाय.
केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या जिवाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. सुप्रीम कोर्टाने टास्क फोर्स स्थापन केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे, असंही नाना पटोलेंनी म्हंटलं आहे.
… जेसीबीच्या सहाय्याने शेकडो मृतदेहांचे क्रूरपणे दफन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आकलन करून मोदी सरकारने नियोजन केले नाही. त्यामुळे हजारो लोकांचा ऑक्सिजन, योग्य आरोग्य उपकरणे, पुरेशा लसींअभावी मृत्यू होत आहे. शेकडो मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने क्रूरपणे दफन केली जाताहेत. तर शेकडो मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत.
लस नाही, औषध नाही, ऑक्सिजन नाही, ‘पीएम केअर’मधून पुरवलेली उपकरणे देखील दुय्यम दर्जाची आहेत. मोदी यांचे आपत्ती धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन किती पोकळ आहे?, याची जागतिक प्रसारमाध्यमांनी पोलखोल केलीय.
कोरोना महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही, असा संदेश जगात गेला आहे. भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता पण, नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी, मनमानीपणा तसेच नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली, अशी टीकाही नाना पटोलेंनी केलीय.
.. म्हणून केंद्रातील मंत्री सोनिया गांधी, राहुल गांधींची खिल्ली उडवतात
केवळ सत्तेचा अहंकार व विरोधी पक्षाची दखल घ्यायची नाही, या विकृत मानसिकतेतून केंद्रातील मंत्री, भाजपचे नेते हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची खिल्ली उडवतात. तसेच भाजपच्या आयटी सेलकडून त्यांना ट्रोल करण्यातच वेळ घालवला जातो.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दलचे कालचे वक्तव्य हे सुद्धा त्यांच्या विकृत मानसिकतेतून तसेच सत्तेच्या मस्तवालपणातून आले आहे, असेही नाना पटोले म्हणाले. .
केंद्रातील विरोधकांनी केलेल्या सूचनांवर अंमलबजावणी केली असती तर आज दिसत असलेले भयनाक दृश्य पहावे लागले नसते. हजारो-लाखो जीव वाचले असते तसेच भारताची जगात एवढी नाचक्की झाली नसती, असेही नाना पटोले म्हणाले.