टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 मे 2021 – महाविकास आघाडी सरकारमधील महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींत आणखी वाढ झालीय. कारण, मनी लॉड्रींग प्रकरणामध्ये ईडीने सुद्धा अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. प्रथम निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला 100 कोटी रुपये वसुली प्रकरणी सीबीआयने नंतर गुन्हा दाखल केला होता. यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता. आता देशमुख यांच्या मागे ईडी लागली आहे.
परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी थेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुली करण्याचा आदेश सचिन वाझे याला दिल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने यासंदर्भात चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश सीबीआयला दिला होता.
सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करुन देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील कार्यालये आणि निवासस्थानी छापे टाकले होते. यामध्ये सीबीआयने अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर आता ईडी सक्रीय झाली असून त्यांनी मनी लाँड्रिगप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झालीय.
जाणून घ्या, काय आहे प्रकरण?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्या सापडल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणावरून गोंधळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला होता.
सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचे टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप केला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी अगोदर सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला.