नागपूर : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भंडारा-गोंदिया बलात्कार प्रकरणातील (Bhandara Gang Rape Case) मुख्य आरोपीचं स्केच तयार करण्यात आलं आहे. स्केचमधील चेहरा कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. (Police appealed) सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे तिची प्रकृती गंभीर असून सध्या तिच्यावर नागपुरात उपचार सुरु आहेत.
एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार प्रकरण उघडकीस आलं आणि संपूर्ण देश हादरला. एकूण 3 आरोपींनी महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी लुखा उर्फ अमित सार्वे आणि मोहम्मद एजाज अंसारी याला अटक केली आहे.
याच प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा गोरेगाव पोलीस सध्या शोध घेत आहेत. हे प्रकरण आता SIT कडे वर्ग करण्यात आलं असून आज SIT कडून पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर फरार आरोपीचं स्केच तयार करण्यात आलं आहे. यात आरोपीचं वय 30 ते 40 वर्षांचं आहे. त्याचा रंग सावळा असून मध्यम बांधा, काळे केस, हलकी दाढी, डाव्या हाताच्या बोटामध्ये दोन-तीन अंगठ्या, पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुलपँट, काळ्या रंगाची सँडल टाइप चप्पल असं वर्णन करण्यात आलं आहे.