TOD Marathi

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान (Mumbai Tour) त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाली असल्याचे आढळून आले आहे. एका खासदाराचा स्वीय सचिव (PA)असल्याचे सांगत एक व्यक्ती काही तास अमित शाह (Amit Shah) यांच्याभोवती घुटमळ होती. या व्यक्तिला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तात्काळ अटक केली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हेमंत पवार असे या आरोपीचे नाव आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) हे 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे आणि वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळातील गणरायाचे दर्शन घेतले होते. दरम्यान अमित शाह यांच्या सुरक्षितेची काळजी मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली होती. मात्र, एक व्यक्ती शाह यांच्या भोवती वावरत होती. आपण आंध्र प्रदेशातील खासदाराचे स्वीय सचिव (PA )आहोत असं त्याने सांगितले होते. परंतु मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला या व्यक्तीवर संशय आला आणि त्यांनी ताबडतोब मुंबई पोलिसांना याची माहिती दिली.

या गोष्टीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी या व्यक्तिला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली. यातील आरोपीचे नाव हेमंत पवारअसल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे. यानंतर आरोपी पवार याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर अमित शाह किंवा इतर नेत्यांसोबत मोठी ओळख असल्याचे सांगून तो फसवणूक करत होता का, त्याने आतापर्यंत कितीजणांना गंडा घातला, याचाही तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.