जळगाव शहरात हरिविठ्ठल नगर येथे तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री घडला आहे. तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन जखमी केली होते. नंतर जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचार सुरु असताना अवघ्या तासाभरातच तरुणाचा मृत्यू झाला.
मृत पावलेल्या व्यक्तीचे दिनेश काशिनाथ भोई (वय ३२) असे नाव आहे. या घटनेनंतर अवघ्या तासाभरात पोलिसांनी विठ्ठल माऊली हटकर या संशयिताला अटक केली आहे. दरम्यान अवघ्या तीन दिवसात खूनाची ही दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठल नगरात दिनेश भोई हा त्याच्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या घरासमोरच विठ्ठल माऊली हटकर हा संशयित राहतो. विठ्ठलसोबत भोई यांच्या परिवाराचा जुना वाद आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दिनेश आणि विठ्ठल यांच्यात वाद झाला. आणि याच वादातून विठ्ठलने दिनेशच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला. यात दिनेश हा घटनास्थळी कोसळला तेव्हा त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. मृत दिनेशच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा सबंध परिवार आहे. सेंट्रींग काम करुन तो त्याच्या आणि घरचा उदरनिर्वाह भागवित होता.
घटनास्थळाजवळ दडून बसलेल्या संशयिताला बेड्या
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर रामानंदनगर पोलिस घटनास्थळावर पोहचले. याठिकाणी संशयित विठ्ठल हा एका जागी लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख या कर्मचाऱ्यांनी विठ्ठल याला अटक केली. दरम्यान त्याच्याकडून रॉड जप्त करण्यात आला असून त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.