राज्यात सुरू झालेल्या राजकीय नाट्यानंतर यंदा आषाढी एकादशीला विठुरायाची महापूजा कोण करणार, याची राज्यभरात मोठी चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर शिंदे यांनाच शासकीय महापूजेचा मान मिळणार असल्याचं स्पष्टच झालं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे. (Shasakiy Mahapuja at Pandharpur)
आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) सोहळ्यासाठी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. मात्र राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली तरच मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौऱ्यावर येता येणार आहे.
विश्रामगृह येथे पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी याचा समारोप सोहळा होणार आहे. एकादशीच्या दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. नंतर सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यासही हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोग नेमक्या कोणकोणत्या कार्यक्रमांना परवानगी देणार, यावर मुख्यमंत्र्यांचा दौरा अवलंबून राहणार आहे. (CM Eknath Shinde on Pandharpur tour) काही वर्षांपूर्वी कार्तिकी यात्रेला अशीच आचारसंहिता लागू असताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना शासकीय महापूजेस परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महापूजेची परवानगी मिळेल, अशी माहिती आहे.