TOD Marathi

मंगलदास बांदल याच्यावर 5 वा गुन्हा दाखल ; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून घेतली जमीन, लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

टिओडी मराठी, पुणे, दि. 31 जुलै 2021 – पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल याच्याविरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. बांदल याने एका शेतकर्‍याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले आणि परस्पर सुमारे 6 कोटी 75 लाख रुपये काढून घेतले आहेत, असा प्रकार समोर आला आहे. यात शिवाजीराव भोसले बँकेतील एका अधिकार्‍याचा सहभाग आहे.

याप्रकरणी गंगाराम सावळा मासाळकर (वय 74, रा. वढु खुर्द, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार वढु खुर्द येथे 2013 मध्ये आणि त्यानंतर वेळोवेळी घडला आहे.

दाखल फिर्यादीनुसार याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मंगलदास बांदलसह 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय. संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध 342, 384, 385, 386, 387, 34 सह आर्म अ‍ॅक्ट खाली गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी यांची हवेली तालुक्यामध्ये गट क्र. 153/1 मध्ये 3 हेक्टर 71 आर जमीन आहे. बांदल आणि इतरांनी फिर्यादी यांना चारचाकी वाहनात डांबून ठेवून दमदाटी करुन आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन घेतले. तसेच त्यांच्या परस्पर सुमारे 6 कोटी 75 लाख रुपये काढून घेतले.

या जमिनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी सुमारे 1 कोटी रुपयांची मागणी केली. त्याचे राजकीय लांगेबांधे असल्याने फिर्यादी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यास ते फिर्यादीच्या कुटुंबियांना त्रास देईल, म्हणून त्यांनी बांदल विरोधात तक्रार दिली नव्हती. त्यांनी अद्यापर्यंत फिर्यादीचे जमिनीवरील बोझा कमी केला नाही.

पुण्यातील सराफ व्यावसायिकाला सुमारे 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना पुणे पोलिसांनी मार्च 2020 मध्ये अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने त्याची पक्षातून हकालपट्टी केलीय.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात मंगलदास बांदल यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. शिक्रापूर इथल्या दत्तात्रय मांढरे यांच्या फिर्यादीवरुन बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी 26 मे रोजी अटक केली होती. त्यानंतर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने त्याच्याविरोधात फिर्याद दिलीय. याचा तपास सुरु असताना रवींद्र सातपुते यांची फिर्याद दाखल झाली होती.