TOD Marathi

Court ने मंगलदास बांदल यांच्या Wife चा अटकपूर्व जामीन फेटाळला ; गाळेधारकाची फसवणूक प्रकरणाची झाली सुनावणी

टिओडी मराठी, पुणे, दि. 13 जुलै 2021 – गाळेधारकाच्या गाळ्यांचे बनावट कुलमुखत्यार दस्त आणि पुरवणी दस्त तयार करून शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतून सव्वा कोटींचे कर्ज घेत गाळेधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचा माजी सभापती मंगलदास बांदल याची पत्नी रेखा हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला आहे.

याप्रकरणी दत्तात्रय रावसाहेब मांढरे (वय 53, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिलीय. त्यानुसार, मंगलदास व रेखा बांदल यांच्यासह ७ जणांविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जुलै 2004 ते मार्च 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी रेखा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केलाय. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मंगलदास बांदल असून तो अर्जदाराचा पती आहे.

त्याने अन्य संशयितासोबत मिळून फिर्यादीच्या संमतीशिवाय त्याच्या नावावरील गाळ्यांचे बनावट पुरवणी दस्त तयार केलेत.

त्या आधारे गहाणखताच्या तयार करून शिवाजीनगर भोसले सहकारी बॅंकेच्या वडगावशेरी शाखेतून सव्वा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले आहे.

संशियितांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी संगनमताने हा गंभीर गुन्हा केलाय. त्या या प्रभावशाली असून त्यांना जामीन झाल्यास गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव आणून तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी अॅड. कावेडीया यांनी केलीय.