टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 जुलै 2021 – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी वसुलीचे आरोप केलेत. या आरोपांचा तपास ईडीकडून सुरुय. याप्रकरणी आता ईडी अधिकारी लवकरच परमबीर सिंग यांना चौकशीचे समन्स बजावणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव ईडीच्या कोठडीत आहेत.
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय.
याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झालीय. त्या जनहित याचिकेत मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.
या करणी सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केलाय. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केलाय. ईडीने अनिल देशमुखसह इतरांवर गुन्हा दाखल केलाय.
या गुन्ह्यात दोघांना अटक केली आहे. यानंतर ईडीने विशेष कोर्टातून सचिन वाझे याची जेलमध्ये जाऊन चौकशी करण्याची परवानगी मिळवलीय.