TOD Marathi

पुणे :
योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांसंबंधी वक्तव्यावर माफी मागितली आहे (Yoga guru Baba Ramdev has apologized for his statement regarding women). राज्य महिला आयोगाने त्यांच्या विधानाची गंभीर दखल घेत रामदेव बाबांना दोन दिवसात खुलासा करण्याची नोटीस पाठवली होती. यावर रामदेव बाबांनी (Baba Ramdev) मत व्यक्त केलं आहे.

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी ठाणे (Thane) येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत याबाबत दोन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्यासाठी त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीला रामदेव बाबांनी ईमेलद्वारे उत्तर देत खुलासा केला आहे आणि आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे.

काय म्हणतात रामदेव बाबा?

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 नुसार मी कुठलाही अपराध केलेला नाही. मी जागतिक स्तरावर महिला सबलीकरणासाठी काम करत आलो आहे. जेणेकरुन महिलांना समाजात समानतेचा दर्जा प्राप्त होण्यास मदत होईल. भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनांना प्रोत्साहन दिलंय. इतकंच नाही तर महिलांचं समाजातील स्थान मजबूत करण्यासाठी विविध संघटनांच्या साथीने कामही केलंय.

महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. महाराष्ट्रातील ठाण्यात आयोजित कार्यक्रम महिला सशक्तीकरणासाठी होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लीपमधून माझ्या शब्दांना चुकीचा अर्थ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मी आई आणि मातृशक्तीचा नेहमीच गौरव केला आहे. मी एक तासाच्या लेक्चरमध्ये वस्त्रांसंबंधी जे वक्तव्य केलं, त्याचा अर्थ माझ्याप्रमाणे वस्त्रांप्रमाणे साधी वस्त्रं असा होता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दांनी ज्यांना वाईट वाटलं त्यांची मी निरपेक्ष भावनेने क्षमा मागतो, असं रामदेव बाबा म्हणाले.

काय बोलले होते रामदेव बाबा?

महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते. त्यानंतर महिलांसाठी महा संमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महा संमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र सकाळी योग विज्ञान शिबिर झाले, त्यानंतर महिलांसाठी योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यानंतर लगेच महिलांसाठी महा संमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी भाष्य करताना म्हटले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही हरकत नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पुढे बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने पाहता काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा म्हणाले.

यावेळी रामदेव बाबांसोबत मंचावर शेजारीच अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) बसल्या होत्या. यांनी या विधानावर ना आक्षेप घेतला, ना कुठली प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.