TOD Marathi

राज्यातलं हे नवं सरकार ज्या परिस्थितीत अस्तित्वात आलं ते पाहता भारतीय संविधान, कायदेमंडळ, सभागृह यांच्या एकूण मर्यादांबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. कोण गटनेता, कोण व्हीप, कोण पात्र-कोण अपात्र याचा फैसला व्हायच्या आधीच हे सत्तानाट्य घडवून आणलं आहे असं परखड मत राज्याच्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. (Congress leader Yashomati Thakur on present government)

आपल्या ह्रदयावर हात ठेवून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अंतरात्माचा आवाज ऐकला पाहिजे. (Devendra Fadnavis and Ekanath Shinde) खरं तर सरकार स्थापनेचा जनादेश शिवसेना भाजपा युतीला मिळाला होता. तुम्ही तुमचे शब्द पाळले नाहीत म्हणून हे सरकार बनू शकलं नाही आणि राज्याला एक स्थिर सरकार देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. हे सरकार तुम्हाला पाडायचं होतं तर उध्दवजींच्या पाठीत सुरा खुपसायचा नव्हता. बाळासाहेबांचा मुलगा तरी सोडायचा होता. उध्दवजींना सांगितलं होतं की तुम्ही सत्ता सोडायला सांगितली असती तर त्यांनी सोडली असती पण ज्या पद्धतीची गद्दारी करून हे सत्ता नाट्य घडवून आणलं गेलं याबाबत साधनशुचितेच्या गोष्टी करणाऱ्या संघाने ही विचार करावा.

नव्या सरकारला शुभेच्छा कशा द्यायचा असा प्रश्न माझ्यासमोर आहे. हे ED सरकार आहे. कायद्याच्या कसोटीवर पाहिलं तर हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. नैतिकतेच्या मुद्द्यावर तर हे सरकार अस्तित्वातच यायला नको होतं. असो, आपण या राज्यातील १२ कोटी जनतेच्या आशा-आकांक्षांचे विश्वस्त आहात. या आकांक्षांचे आपण रक्षण करावे या कामना. या प्रसंगी माझी एकच अपेक्षा आहे, जरा कायद्याने वागा असं यशोमती ठाकुर म्हणाल्या आहेत.