TOD Marathi

मुंबई : आम्हाला घर सोडण्याची बिलकुल इच्छा नाही. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. सगळे आमदार दुःख सांगायला जायचे. पण चहापेक्षा किटली गरम, असं म्हणत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेतृत्त्वावर नाव न घेता टीका केली. (Gulabrao Patil allegates Sena leaders and appreciates Ajit Pawar) विशेष म्हणजे पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक केलं. अर्थमंत्री अजित पवार निधी देत नाहीत. आम्ही कामं करायची कशी, असा प्रश्न शिंदे गटातील बंडखोर आमदार विचारत असताना पाटील यांनी त्याचं अजित पवारांचं मात्र कौतुक केलं.

अजितदादांचा हेवा वाटतो. नेता असावा तर असा. सकाळी ६ वा. ते कामाला सुरुवात करतात. छोट्या कार्यकर्त्यांचं ऐकतात. विरोधी पक्षाचा की सत्ताधारी पक्षाचा ते न बघता काम करतात. कार्यकर्त्याला दुसरं काय लागतं? एक मंत्री तर असा की पाहायलाच तयार नाही. जसा की मी त्याच्याकडे उधारी मागायलाच आलो आहे, अशा शब्दांत पाटलांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना नाव न घेता टोला लगावला.

अजितदादांचं टार्गेट १०० आमदार निवडून आणण्याचं आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचं १० आमदारांचं आहे. पण आमचं काय? सगळे पक्ष वाढवत आहेत. पण आमचं घर जळतंय. एक काळ होता, भुजबळ गेले तेव्हा केवढा उठाव झाला. राणे गेले तेव्हा उठाव झाला. आज काय झालं? थोडंसं झालं. मतदारसंघात जाऊ तेव्हा आमची यात्रा पाहा. आम्ही शिवसैनिकांना मान्य असलेला निर्णय घेतला. पक्षातील ४० आमदार गेले. पाच टर्मला निवडून आलेले आमदार गेले. मंत्रिपदं सोडून आमदार फुटतात, असं पाटील म्हणाले.

चार लोकांनी आमच्या उद्धव साहेबांवर ही वेळ आणली. आमची मतं घेऊन खासदार होतात आणि लायकी नसताना बोलतात. आम्हाला गटार म्हणतात. पण या डुकरांची मतं घेऊन तुम्ही निवडून आलात. हे कोण सहन करणार? असा सवाल करत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) महाराष्ट्रात फिरले नाहीत. एकटे एकनाथ शिंदे महाराष्ट्रात फिरले. जळगावात ते पाच वेळा आले. शरद पवार राज्यात फिरतात, अजित दादा फिरतात. पण आमचे नेते का नाही आले? आमचं हे दुःख सर्वांना समजलं असेल की का गेलो. आम्ही परत आमच्या घरात आलोय. देवेंद्रजी आणि मोदी साहेबांचं आभार मानतो. ५० आमदार असलेल्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद देऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, असं म्हणत पाटलांनी मोदी आणि फडणवीस यांचं कौतुक केलं.