TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 19 जून 2021 – भारतातील औषध कंपनी असलेल्या झायडस कॅडिला कंपनीकडून त्यांच्या ZyCoV-D या लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी हवी आहे, त्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे येत्या आठवड्यात तशा प्रकारची विनंती करणार आहे. जर या लसला मान्यता मिळाल्यास ती जगातील पहिली DNA आधारित लस ठरणार आहे.

आतापर्यंत ३ लसींच्या आपात्कालीन वापराला भारतात परवानगी मिळालीय. झायडस कॅडिलाच्या ZyCoV-D लसीच्या वापराला परवानगी मिळाल्यास ती देशातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस ठरणार आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची आकडेवारी तयार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी झायडस कॅडिलाने 28,000 स्वयंसेवकांचा वापर केला होता. त्याचा अहवाल आता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे सादर करणार आहे. 12 ते 18 वयोगटातील बालकांसाठीही ही लस उपयुक्त आहे, असे सांगण्यात येत आहे.

झायडस कॅडिलाची ZyCoV-D ही लस डीएनए आधारित आहे, त्यात एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद स्थित या कंपनीच्या लसीच्या साठवणुकीसाठी दोन ते चार डिग्री सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे त्याच्या साठवणुकीसाठी कोल्ड चेनची गरज नाही. त्यामुळे देशभरात त्याचे वितरण सुलभपणे होणार आहे.

देशात आतापर्यंत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन, सीरमची कोव्हिशिल्ड आणि रशियन स्पुटनिक व्ही या लसींना परवानगी मिळालीय. यात आता ZyCoV-D ची भर पडणार आहे, असे समजते.