TOD Marathi

कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं. त्यांनी तिथेच सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर सोमय्या यांनी टीका केली आहे.

किरीट सोमय्या यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले, मला सोमय्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एकदा तक्रार केली आहे. मग त्या तपास यंत्रणा तपास करतील की, तुम्ही कशाला पर्यटन करायला जात आहात? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज असे म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला? यावर आक्षेप घेत मी हायकोर्टात जाणार असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.

तुम्हाला सुपारी दिलीये तर तुम्ही तुमचे काम करा आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्या. तुम्ही बदनामी का करत आहात? असा सवाल मुश्रीफ यांनी विचारला. तसेच आमच्यावर आत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. पण ते होणार नाही. शरद पवारांचा काय संबंध आहे ह्यात? त्यांचे नाव का घेत आहात? त्यांचं नाव घ्यायची लायकी आहे का, असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे.