TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 15 मे 2021 – जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी भारतातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केलीय. “भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती चिंताजनक असून अनेक राज्यांमध्ये रुग्णावाढ होत आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या साथीचं दुसर वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक धोकादायक ठरेल, असे मत घेब्रेसस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय.

भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, जागतिक आरोग्य संघटनेकडूनही मदतीचा हात दिला आहे. हजारो ऑक्सिजन कॉनसनट्रेटर्स, मोबाइल फिल्ड हॉस्पिटलसाठी तंबू, मास्क आणि अन्य वैद्यकीय साहित्य भारतात पाठविले आहे, असे ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले आहे.

दरदिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण आणि चार हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत. मात्र, मागील दोन दिवसात सलग कोरोनामुक्तांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. शुक्रवारी भारतात 3 लाख 26 हजार 98 नवीन रुग्ण सापडले तर, 3 लाख 53 हजार 299 जण कोरोनामुक्त झाले. तर मागील 24 तासात 3 हजार 890 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय.

आतापर्यंत भारतात एकूण 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 जणांनी कोरोनावर मात केलीय. तसेच 2 लाख 66 हजार 207 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 36 लाख 73 हजार 802 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.