TOD Marathi

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमातील एका विधानावरून शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या चर्चेतील पूर्णविरामच लावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?, असा सवाल करत संजय राऊत यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.

शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करण्याची भाषा काही लोकांनी केली. काही केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केली. अशा विचारधारेचा हा पक्ष आहे. ते लोक शिवसेनेला दुश्मन मानतात, त्यांच्याशी युती कशी होणार?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काल उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपलं, असं राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे भाषण केले होते, भाषणादरम्यान त्यांचं एक वक्तव्य सध्या फार चर्चेचा विषय ठरला आहे. आजी माजी आणि झाले तर भावी सहकारी, हे वाक्य बोलताना त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बघून त्यांनी हे वाक्य बोललं होतं आणि त्यानंतर सर्वत्रच युतीच्या चर्चेला उधाण आलं. मात्र यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर पूर्णविराम दिल्याचे दिसते.