मुंबई: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. मात्र आता आज दिनांक ४ ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा ‘स्कूल चले हम’ म्हणत विद्यार्थ्यांचा किलबिलाट शाळेत घुमणार आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं आज (४ ऑक्टोबर) विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजून जातील. शिक्षक विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेट होणार असल्याने एक उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.
शाळा सुरु होत असल्या तरीही करोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याने सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट आदेश शासन-प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे, एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती, मास्क-सॅनिटायझर या सर्व नियमांचं पालन करुनच शाळा सुरु होणार आहेत.
शाळा सुरू झाल्या असल्या तरी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांची मंजुरी असणं आवश्यक, विद्यार्थ्यांनी उपस्थिती मोठी असल्यास एक दिवस आड सुरु राहतील, एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश, एका बाकावर एकच विद्यार्थी, सोशल डिस्टन्सिंग राखणं, मास्क घालणं, तसेच सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असणार आहे. त्याच सोबत शिक्षकांची मात्र पूर्ण वेळ उपस्थिती आवश्यक आहे.