TOD Marathi

Mumbai International Airport वर शिवसैनिकांचा राडा ; Adani Board ची केली तोडफोड, नाव बदलल्याने शिवसैनिक संतप्त

टिओडी मराठी, मुंबई, दि. 2 ऑगस्ट 2021 – शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील तो बोर्ड तोडून टाकला.

छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव अदानी एअरपोर्ट असे लिहून विमानतळाच्या मुख्य दर्शनी भागात काल रात्री लावले. त्यानंतर आज सकाळपासूनच नागरिकांना अदानी एअरपोर्ट असे नाव दिसताच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याकडे याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी काल रात्री लावलेले ‘अदानी एअर पोर्ट’ नावाची तोडफोड केली.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले आहे. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर अदानी एअरपोर्ट असे बोर्ड विमानतळ परिसरात लावले आहे. मात्र, तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाही, असे शिवसैनिकांचे म्हणणं आहे.

मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेकडून केली आहे. अन्यथा, जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड केली जाईल, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.