मुंबई | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. गेल्या काही तासांपासून सोमय्या यांच्या या व्हिडिओ क्लीप्सची जोरदार चर्चा सुरु आहे. या सगळ्या विषयावर बुधवारी विधानभवनात आलेल्या उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे म्हणाले की, मी असले किळसवाणे आणि बिभत्स व्हिडीओ बघत नाही. मात्र, त्यावर राज्यातील जनतेने खासकरुन माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मला वाटते या महिलांच्या भावनांची कदर सरकारने केली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
हेही वाचा” …“आम्ही त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अस्पृश्य”, AIMIM ची ‘INDIA’वर नाराजी”
किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओंमुळे सध्या राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. कालच ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानपरिषदेत सोमय्या यांच्या व्हिडीओंचा मुद्दा उपस्थित करत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ क्लिप्सचा साठा असलेला पेनड्राईव्ह सभापतींकडे सुपूर्द केला होता.
किरीट सोमय्या यांनी या महिलांचे शोषण केले असावे, अशी माहितीही आमच्या कानावर आली आहे. या सगळ्याची चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.
तर दुसरीकडे राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. महिला आयोगाने मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने अश्लील व्हिडीओ प्रकरणात तपासाला सुरुवात केली होती. या तपासातून आता काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.