TOD Marathi

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीआधी देशातले बहुतांश विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएविरोधात एकत्र आले आहेत. याआधी २३ जून रोजी विरोधकांची बिहारच्या पाटणा येथे पहिली बैठक पार पडली होती. मोदींविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू असून त्याला आता यश येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींविरोधात आतापर्यंत २६ पक्ष एकत्र आले आहेत. परंतु या दोन्ही बैठकींच्या वेळी एआयएमआयएम पक्षाला निमंत्रण दिलं नव्हतं. यावर एआयएमआयएम पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.

एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण म्हणाले, हे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष काल बंगळुरूत भेटले. ते १७ – १८ पक्ष एकत्र आले आहेत. परंतु त्यांनी आम्हाला बोलावलं नाही. कारण आम्ही त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अस्पृश्य आहोत. त्यांच्या त्या बैठकीला नितीश कुमार आले होते, जे पूर्वी भाजपबरोबर होते. त्या बैठकीला उद्धव ठाकरे आले होते, जे पूर्वी भाजपबरोबर होते. मेहबुबा मुफ्ती तिथे होत्या, ज्या पूर्वी भाजपबरोबर होत्या. हे सगळे पक्ष आता अचानक धर्मनिरपेक्ष झाले आहेत.

हेही वाचा” ...पंतप्रधान मोदींच्या शेजारी ७० हजार कोटींचा घोटाळा उभा होता : संजय राऊत”

पुढे वारिस पठाण म्हणाले, तिथे अरविंद केजरीवालही उपस्थित होते. जे यापूर्वी गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसला शिव्या देत होते. त्यांच्यामुळे तिथे काँग्रेसचा पराभव झाला. तेही आता धर्मनिरपेक्ष झाले आहेत. हे लोक म्हणत आहेत की, यांना देशाचं संविधान वाचवायचं आहे, लोकशाही टिकवायची आहे, भाजपला हरवायचं आहे, परंतु आमचंसुद्धा तेच म्हणणं आहे. आम्हालाही तेच करायचं आहे.