TOD Marathi

महाराष्ट्राचं राजकारण सध्या ढवळून निघत आहे. गेल्या काही दिवसात अनेक नव्या गोष्टी घडलेल्या आहेत. यामध्ये अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला (Raj Thackeray Interview) मुलाखत दिली. बऱ्याच दिवसानंतर राज ठाकरेंनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. गेल्या काही दिवसात तब्येतीच्या कारणास्तव राज ठाकरे माध्यमांच्या समोर आले नव्हते, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध सूचना, माहिती मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देत होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशा विविध विषयांवर भाष्य केलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची मुलाखत येत आहे. (Uddhav Thackeray Interview Saamna) दोन दिवसांपूर्वीच या मुलाखतीच्या पहिला टिझर आला होता. आता या मुलाखतीचा दुसरा टिझरही रिलीज़ करण्यात आला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut Shivsena) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा टिझर शेअर केलेला आहे. राज ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे आपल्या मुलाखतीत काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. “हम दो एक कमरे में बंद हो और चाबी खो जाये,” असंच आहे ना सरकार… “अडीच वर्ष मी थेट मुख्यमंत्री होतो मात्र सत्तेची चटक मला लागली नाही” असं यामध्ये उद्धव ठाकरे म्हणत आहेत तर “फुटीरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले” असं संजय राऊत म्हणताना दिसत आहेत.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi government) सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे हे आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाने (Eknath Shinde) शिवसेनेवर दावा ठोकल्याने उद्धव ठाकरे या सर्व विषयांवर काय बोलतात, हे या मुलाखतीतून दिसणार आहे. त्यामुळे या मुलाखतीचे हे दोन्ही टिझर सगळ्यांची उत्सुकता वाढवणारे आहेत.