शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्तांतरानंतर पहिल्यांदाच जाहिर सभा घेतली. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर ही सभा झाली. यामध्ये सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वराज्यावर अनेक शाह जाणून आले, त्यांना माहिती नाही जमिनीवर गवताची नाही तर तलवारीची पाती आहेत, असं म्हणत एक प्रकारे खुलं आव्हान अमित शहा आणि भाजपला दिलं आहे.
सोबतच जो आमच्या आईवर वार करायला येईल त्याचा राजकारणामध्ये आम्ही कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही असे देखील म्हटलं आहे. मुंबई वर गिधाड फिरत आहेत, मुंबईचे लचके तोडण्याचे प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही ते होऊ देणार नाही असं देखील म्हटलं आहे.
मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा धावून जातो तो शिवसैनिक यांना केवळ प्रॉपर्टी साठी मुंबई पाहिजे आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
एकंदरीत दसरा मेळाव्यापूर्वी दसरा मेळाव्याचा ट्रेलर असलेलं हे भाषण आहे. संजय राऊत यांचा देखील विशेष उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. ‘नाही तर तुम्ही उद्या बातमी छापाल चौकटीत की गेले संजय राऊत मिंधे गटात’ असा टोला लगवलाय. संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान आहे, मोडेन पण वाकणार नाही असा बाणा ठेवून संजय राऊत लढतात. असे देखील म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची आठवण केली.
वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे:
आज एवढी गर्दी आहे तर दसऱ्याला केवढी असेल?
दसरा मेळावा शिवतीर्थावर म्हणजे शिवतीर्थावरच होणार
मिंधे सगळे तिकडे गेलेले आहेत
मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने संजय राऊत लढत आहेत
मुलं पळवणारी टोळी बघितली आहे पण बाप पळवणारी अवलाद महाराष्ट्रात फिरत आहे
ज्यांना सत्तेचे दूध पाजलं त्यांच्या तोंडातून गटार वाहतात
मुंबईचे लचके तोडण्यासाठी आता मुंबईवर गिधाड फिरायला लागलेत
व्यासपीठावर आल्यावर पाहिलं आमचे वडील आहेत का?
तुम्ही आम्हाला जमीन दाखवायचा प्रयत्न करा आम्ही तुम्हाला आसमान दाखवूच
मुंबई संकटात असते तेव्हाही विधान कुठे असतात
गिधाडांना मुंबईचे लचके तोडू देणार नाही
स्वराज्यावर अनेक शहा चालून आले, त्यांना माहिती नाही जमिनीवर गवताची पाती नाही तलवारीची पाती आहेत
जो आमच्या आई वरती वार करायला येईल त्याचा राजकारणामध्ये आम्ही कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही
दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी मिंधे गटाची अवस्था
लोकशाही जिवंत आहे का? हे कोर्टाचा निर्णय ठरवेल
वाटा खोके आणि करा सरकार, कशाला हव्यात निवडणुका?
हे फिरतं सरकार, फिरा, फिरायची सवय झाली
शिवसेनेच्या वाटेला यायचा प्रयत्न करू नका
ठाकरे घराणं संपवण्यासाठी सगळे एकत्र
शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेली नाही
रक्तपात झाला तर आपल्यात आणि गद्दारात होईल
कोरोनात लोकांचे प्राण वाचवले हा भ्रष्टाचार असेल तर तो मी पुन्हा करणार
येणारी निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक असेल
तुमच्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक आहे असे समजून लढा
भाजपने माणसं धुवायची लॉन्ड्री काढलीय का?
करून दाखवलं म्हणून मुंबईकरांनी जिंकून दिलं
ढिगभर गद्दार असण्यापेक्षा मुठभर प्रामाणिक असलेले बरे
ज्या नगरसेवकांना जायचं आहे, त्यांनी देखील खुशाल जा
अशाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत भाजपसह भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर शिंदे गटावर देखील जोरदार टीकास्त्र सोडलं. दसरा मेळाव्यापूर्वी दसरा मेळावा कसा असेल याचा हे एक प्रकारे ट्रेलर होतं. काही गोष्टी मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे, असं सांगायला देखील उद्धव ठाकरे विसरले नाहीत.