TOD Marathi

Tokyo Olympics 2020 : तलवारबाजीमध्ये भवानी देवीचा विजय ; जाणून घ्या, कोण आहे Bhavani Devi ?

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, टोकियो, दि. 26 जुलै 2021 – जपानच्या टोकियो इथे सुरु असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिला तलवारबाजी अर्थात फेन्सींगच्या स्पर्धेत भारताच्या सी. ए. भवानी देवीने विजय संपादन केला आहे. चंदलवदा आनंदा सुब्रमणियम भवानी देवी असे तलवारीसारखे लांबलचक नाव असलेल्या या महिला खेळाडूने राऊंड ऑफ 64 मध्ये प्रथम विजय मिळवला आहे. याबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

भवानी देवीने पहिल्या फेरीमध्ये ट्युनिशियाच्या नादिया बेन अझिझी हिच्यावर 15-3 अशा गुण फरकाने मात केली. हा सामना एकतर्फी झाला. भवानी देवीच्या आक्रमणापुढे नादियाचा टिकाव लागत नव्हता. या सामन्यात भवानी देवीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि आघाडी घेतली.

त्यांनतर राऊंड ऑफ 32 घेतला. यावेळी भवानी देवीची लढत अनुभवी व अग्रमानांकित फ्रान्सच्या मॅनन ब्रुनेटबरोबर होती. मॅननचा अनुभव व आक्रमणातील धार यापुढे भवानी देवीचे फारसे चालले नाही. हा सामना मॅन ब्रुनेटने 15-7 अशा गुण फरकाने जिंकला.

भारताची तलवारबाज भवानी देवीने सोमवारी नव्या इतिहासाची नोंद केली आहे. ती ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय आहे. याअगोदर कोणत्याही भारतीयाला जे जमले नाही, अशी कामगिरी भवानी देवीने केली आहे.

राष्ट्रीय चॅम्पियन भवानीला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यामध्ये अपयश आलं असलं तरी तिने अनेक भारतीयांना प्रेरणा दिलीय.

पर्याय नव्हता म्हणून निवडला खेळ :
तामिळनाडूच्या भवानी देवीचा तलवारबाजीत प्रवेश नाईलाजाने झाला आहे. तिच्या शाळेमध्ये सहा खेळ होते. तिला यापैकी एका खेळाची निवड करायची होती. भवानी देवीने निवड करण्यापूर्वी अन्य खेळातील जागा पूर्ण झाल्या आहेत.

त्यामुळे तिने तलवारबाजीचा खेळ निवडला. खेळ नाईलाजाने निवडला असला तरी कमी वेळात भवानी देवीला तलवारबाजीची आवड लागली. त्यामुळे केरळच्या राष्ट्रीय अकादमीमध्ये तिची निवड झाली.

भवानी देवीने 2009 मधील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पहिले मेडल पटकावले आहे. या स्पर्धेत ती तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यानंतर 2014 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकण्याचा विक्रम भवानी देवीने केला आहे.

आम्ही बांबूच्या काठीने सराव केला – भवानी देवी
तलवारबाजी खेळण्यासाठी मी खोटं हि बोलले आहे, अशी कबुली भवानी देवीने याअगोदर दिली आहे. मला वडिलांचे वार्षिक उत्पन्न विचारले होते, कारण, तलवारबाजी हा खेळ खूप महाग आहे. त्यावेळी मी खोटं बोलले आणि वडिलांचे उत्पन्न अधिक सांगितले.

सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही बांबूच्या काठीने सराव करत होते. तलवारीचा वापर हा केवळ स्पर्धेत केला. तलवार खूप महाग आहे, ती तुटली तर तिचा खर्च आम्हाला परवडणारा नव्हता. तसेच ती भारतामध्ये सहज मिळत नव्हती, असे भवानी देवीने सांगितलं.