टिओडी मराठी, टोकियो, दि. 24 जुलै 2021 – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंगपट्टूची खराब सुरुवात आणि कमकुवत आत्मविश्वासामुळे विकास कृष्णन स्पर्धेबाहेर पडला. त्यामुळे अनुभवी आणि पदकाची अपेक्षा असणारा विकास कृष्णनचा ऑलिम्पिक प्रवास संपलाय.
वेल्टर ६९ किलोग्राम वजनी गटाच्या अंतिम ३२ सामन्यामध्ये त्याला ० – ५ असा पराभव स्वीकारावा लागलाय. त्याला जपानच्या सेव्हनरेट्स क्विन्की मेनसाह ओकाझावाने सहज पराभूत केलं. पूर्ण सामन्यात विकास कमकुवत आत्मविश्वासाने खेळताना आढळला. पहिल्या फेरीमध्ये पाचही पंचांनी जपानच्या ओकाझावाला १० गुण दिले तर विकासला केवळ ९ गुण मिळाले.
दुसर्या फेरीमध्ये अशी परिस्थिती राहिली. तिसर्या फेरीत विकासला फारसे काही करता आले नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमधील त्याचा प्रवास संपला. हाय-व्होल्टेज सामन्यामध्ये २९ वर्षीय विकासला डाव्या डोळ्याखाली दुखापत झाली.
संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खांद्याच्या दुखापतीसह तो मैदानामध्ये उतरला होता. उद्या रविवारी बॉक्सर मेरी कोम व मनीष कौशिक यांचे सामने होणार आहेत.
सामन्यादरम्यान ओकाझावाने शेवटपर्यंत वर्चस्व ठेवले. तो रिंगमध्ये फार चपळ दिसला. त्याने दोन वेळचा ऑलिम्पियन विकासला सहज हरवले. २५ वर्षीय ओकाझावाने २०१९ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
त्याच वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत गाठली होती. आता त्याचा सामना तिसऱ्या मानांकित क्युबाच्या रोनिएल इगलेसियासशी होणार आहे. इगलेसिया २९१२ची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता व माजी विश्वविजेता आहे.