TOD Marathi

यंदा संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 July पासून सुरु होणार – सभापती Om Birla यांची माहिती, विरोधक अनेक मुद्यांवर सरकारला घेरणार

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 जुलै 2021 – यंदा संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 19 जुलैपासून सुरू होणार आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार असून याचे कामकाजाचे 19 दिवस असणार आहे, अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सोमवारी दिली.

कोविड नियमांनुसार सर्व सदस्य आणि माध्यमांना परवानगी दिली जाणार आहे. मात्र, आरटीपीसीआर (RTPCR ) चाचणी अनिवार्य केलेली नाही. ज्या सदस्यांनी लस घेतली नाही, त्यांना कोरोनाची चाचणी घेण्यास आम्ही विनंती करू, असे लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले आहेत.

या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष अनेक विषयांवर सरकारला घेराव घालणार आहेत. उत्तर प्रदेशातील नुकत्याच झालेल्या ब्लॉक प्रमुख निवडणुकीमध्ये झालेला हिंसाचार, कोरोना लसीकरण किंवा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी या सर्व मुद्दयांवरून विरोधी पक्ष मोदी सरकारला धारेवर धरणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याचबरोबर, कृषी कायदे रद्द करण्याची मागणीही संसदेमध्ये पुन्हा एकदा होऊ शकते. दुसरीकडे, संसदेचे कामकाज कोणत्याही अडथळाविना करता येणार आहे. याची खात्री करुन घेण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न असणार आहे. तसेच, या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार अधिक बिले मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, असे समजते.

दरवर्षी पावसाळी अधिवेशन हे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होते आणि स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर संपते. मागील वर्षी कोरोनाच्या संकट काळात 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवला होता.

कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंगनुसार खासदारांची बैठक व्यवस्था, दोन रांगेमध्ये काचांचे आवरण अशा अनेक पद्धतीने केली होती. खासदारांच्या डेस्कसमोर काचेचे आवरणही लावले होते. इतकेच नाही तर उभे राहून बोलण्यास मनाई केली होती.