टिओडी मराठी, मुंबई, दि. 29 मे 2021 – राज्यातील महा’वसुली’ सरकारने मराठा समाजाचा घात केला आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. सध्या मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला अनेकांनी धारेवर धरलं आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण रद्द झालं, त्याला जबाबदार कोण? असं म्हणत आता महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. तसेच महाविकास आघाडीकडूनही या टीकेला जोरदार उत्तर दिलं जात आहे.
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रात हे महाविकास आघाडी अर्थात महा’वसुली’ सरकार आल्यापासून ‘महत्त्वाच्या विषयांकडे’ कानाडोळा केला आहे. मराठा आरक्षणात गद्दारी करून संपूर्ण मराठा समाजाच्या अनेक पिढ्यांचे नुकसान केलं आहे.
राज्याच्या महत्त्वाच्या विषयात सत्ताधारी महावसुली सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे तिघाडी सरकार अजिबात गंभीर नाही. कुरघोडी करून सत्ता मिळवली आहे, त्या सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. मराठा समाजाची अतोनात हानी आणि मोठा घात या सरकारने केला आहे.
घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर राज्यात एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचा राज्य सरकारचा अधिकार आणि जबाबदारी कायम आहे. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोग नेमला होता या आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असून त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले होते.
याच मुद्द्यांवरून उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला मंजुरी दिली होती. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेहनत घेऊन प्रत्येक बाबीवर व्यक्तिशः लक्ष दिले होते. परंतु आज मात्र मराठा आरक्षणाकडे केवळ श्रेयवादाच्या माध्यमातून बघितले जात आहे, असे म्हणत लोणीकर यांनी टीका केली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडून किंवा केंद्र सरकारकडे बोट दाखवून महाराष्ट्र सरकार जबाबदारी झटकत आहे. सरकारने मराठा समाजाची दिशाभूल न करतात मराठा आरक्षण टिकविण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत.
आवश्यकता असल्यास आघाडी सरकारने नव्याने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल मिळवावा. तसेच सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाचे जे मुद्दे फेटाळले गेले असतील त्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राजकारणापालिकडे जाऊन विचार करावा आणि मराठा समाज कसा मागास आहे, हे सिद्ध करावे.
अन्यथा, मराठा समाज आघाडी सरकारला माफ करणार नाही, असा इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला.