टिओडी मराठी, परळी, दि. 16 ऑगस्ट 2021 – बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी न देता भाजप नेते भागवत कराड यांना मंत्रीपदाची संधी दिली आहे. यानंतर पंकजा मुंडे नाराज होते. यामुळे कार्यकर्त्यांत मोठा रोष निर्माण झाला होता. प्रीतम मुंडे यांना अद्यापही मंत्रीपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते अद्यापही नाराज आहे. याचाच प्रत्यय भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेत आला.
जनतेशी संवाद साधण्यासाठी नवनियुक्त मंत्री भागवत कराड यांनी १६ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली. भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा गोपीथनाथ गडावरुन सुरु केली.
यावेळी भागवत कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात केली. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते.
बीडमधील परळीतून अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी या यात्रेला सुरूवात केली. प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न मिळल्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा होत होती. यावेळी यात्रेत पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती.
जेवढ्या उंचीची मी आहे, तेवढी लायकी ठेवा –
पंकजा मुंडे या घोषणाबाजीवरुन कार्यकर्त्यांवर भडकल्या. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी झापले. तुम्हाला असे वागायला मी शिकवले आहे का? मुंडे साहेब अमर रहे, या घोषणा आम्ही रोखू शकत नाही. काय अंगार-भंगार घोषणा लावल्या आहेत?, दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम चालू आहे का?. मला शोभत नाही हे वागणे. जेवढ्या उंचीची मी आहे, तेवढी लायकी ठेवा, स्वत:ची नाहीतर मला भेटायला यायचे नाही, असे म्हणत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या.