टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 जून 2021 – नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहेत. तर स्थानिकांकडून प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली जातेय. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्या नावावर जोर दिला गेला. त्यामुळे मुख्यमंत्री दोनदा बैठकीतून उठून गेले. त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.
या बैठकीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये कृती समितीच्या शिष्टमंडळाची बाजू ऐकून न घेता मुख्यमंत्री निघून गेले, असा दावा समितीने केला. त्यामुळे येत्या २४ जून रोजी आंदोलन करण्याचा निर्धार समितीच्या नेत्यांनी व्यक्त केला.
२००८ पासून आहे हि मागणी :
विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी २००८ पासून केली जातेय. तर राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला दिले जाईल, असे जाहीर केलं आहे. तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतलाय. या ठरावाला रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील अनेकांनी तीव्र विरोध केलाय.
येत्या २४ जून रोजी प्रकल्पग्रस्तांच्या सर्वपक्षीय संघर्ष कृती समितीकडून सिडकोला घेराव आंदोलन करणार आहेत. यापार्श्वभूमीवर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली.
बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी दि. बां.चे नाव देण्यास वेगळा पर्याय असेल तर सुचवा, अशी सूचना केली होती. समितीने दि. बां.च्या नावाचा पुनरुच्चार केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीतून उठून निघून गेले.
दि. बां.पाटील यांचे नाव सोडून बोला :
एकनाथ शिंदे यांच्यासमोर समितीच्या नेत्यांनी दि. बां.पाटील यांचे नाव का?, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १५ मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा बैठकीत आले, त्यानंतर नेत्यांनी दि. बां.पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला.
पण, मुख्यमंत्र्यांनी विमानतळ सोडून इतर कोणत्याही वास्तूला नाव देण्याचा पर्याय सुचवला. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर ठाम राहिल्याने बैठकीत अखेर तोडगा निघाला नाही. राज्य सरकार आमच्यावर दबाव टाकणार असेल तर आमचा मार्ग मोकळा आहे, असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिलाय.