TOD Marathi

टिओडी मराठी,पुणे, दि. 16 मे 2021 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तरच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा पुढच्या महिन्यामध्ये होणार आहेत. दि.15 जून 2021 पासून टप्प्याटप्प्याने याबाबत नियोजन करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे.

शनिवारी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्यात दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर या परीक्षा 15 जून 2021 पासून टप्प्याटप्प्याने घेण्यावर एकमत झाले आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्याची रूपरेषा परीक्षा विभागाकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून त्यातच करोनामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद आहे. अशा परिस्थितीत ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी प्रथम सत्र परीक्षा एप्रिल 2021 पासून घेतल्या जात आहेत.

यावेळी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींविना परीक्षा देता आली असून हि परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्‍टर्ड पद्धतीने घेण्यात विद्यापीठाला यश आलं आहे.

या दरम्यान, प्रथम सत्राची परीक्षा जवळपास पूर्ण होत आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रातील परीक्षा देखील लवकर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत होती. त्यादृष्टीने विद्यापीठाने दुसऱ्या सत्रातील परीक्षेचे नियोजन करण्याचे काम हाती घेतले.

त्यानुसार या परीक्षा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्‍य होणार आहे. या दरम्यान, दुसऱ्या सत्रातील सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविणे पूर्ण झाले का?, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा 15 जून 2021 पर्यंत :
करोनामुळे विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय यापूर्वी घेतला. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनात मिळालेले गुण महाविद्यालयाकडून प्राप्त झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येणार नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी दि. 15 जून 2021 पर्यंत प्रात्यक्षिकेची परीक्षा घ्यावी. त्याचे गुण दि. 25 जून 2021 पर्यंत विद्यापीठाकडे सादर करावेत, असाही निर्णय बैठकीत घेतला.

परीक्षा मंडळाच्या बैठकीत दुसऱ्या सत्राच्या परीक्षा जून 2021 मध्ये घेण्याचा निर्णय झाला. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आणि शुल्क भरणे, त्यासंबंधी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची माहिती जितक्‍या लवकर परीक्षा प्राप्त होईल, तेवढ्या लवकर दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेणे शक्‍य होणार आहे. सध्याचा विचार करता जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे.