TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2021 – टोमॅटो उत्पादन करणाऱ्या राज्यात उत्पादन अधिक झाल्यामुळे टोमॅटोचे दर चार रुपये प्रति किलोपर्यंत कोसळले आहेत. देशातील सुमारे 23 टोमॅटो उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये साधारणपणे गेल्या वर्षीच्या तुलनेत टोमॅटोचे दर यंदा 50 टक्‍क्‍यांनी कमी झालेत.

मध्यप्रदेशामध्ये सर्वात अधिक टोमॅटोचे उत्पादन केले जाते. तेथील देवास या मंडीत टोमॅटोच्या किमती आठ रुपयापर्यंत कमी झाल्यात. महाराष्ट्र हा टोमॅटोचे अधिक उत्पादन करणारे सहावे राज्य आहे. जळगाव येथे टोमॅटोचे दर चार रुपयापर्यंत कोसळलेत. औरंगाबाद इथे टोमॅटोचे दर साडेचार रुपये प्रति किलो सोलापूर येथे पाच रुपये प्रति किलो, कोल्हापूर येथे साडेसहा रुपये प्रति किलो या पातळीवर गेलेत.

नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउडेशन या संस्थेचे संचालक आर के गुप्ता यांनी असे सांगितले की, चांगले पर्जन्यमान आणि योग्य हवामानामुळे देशात टोमॅटोचे उत्पादन वाढल्यामुळे टोमॅटोचे दर कमी झालेत. लावणीवेळी टोमॅटोचे दर चांगले असल्यामुळे सर्वच शेतकऱ्यानी टोमॅटोचे उत्पादन घेतल्यामुळे अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी टोमॅटोवर प्रक्रिया करण्याशिवाय मार्ग नाही, असे त्यांनी सांगितले आहे. कृषी मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या माहितीनुसार मागील वर्षी टोमॅटोचे उत्पादन 20. 55 दशलक्ष टन झाले होते. यंदाही उत्पादन 2.20 टक्‍क्‍यांनी वाढून 21 दशलक्ष टनांपर्यंत गेले आहे. त्यामुळे बाजारपेठेत टोमॅटोचे दर कमी झालेत.